‘बिग बी’ मुंबई इंडियन्सच्या भेटीला

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आयपीएलचे चॅम्पियन्स मुंबई इंडियन्स संघाची मंगळवारी भेट घेतली. रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर मिळवलेल्या रोमांचक विजयानंतर मुंबईने आयपीएलच्या चषकावर तिसऱ्यांदा विजयाची मोहोर उमटवली. ‘बिग बी’ क्रिकेटचे चाहते आहेत. भारतीय संघाचे सामने ते आवर्जुन पाहात असतात. भारतीय संघाच्या विजयाचं सेलिब्रेशन करतानाही आपण त्यांना अनेकदा पाहिलं आहे. आयपीएलमध्ये ‘बिग बी’ यांचा मुंबई इंडियन्सच्या संघाला पाठिंबा असतो. अनेकदा त्यांनी मुंबईच्या सामन्यांचा स्टेडियममध्ये उपस्थित राहून आनंद लुटला आहे.

हैदराबादमध्ये मुंबईने रविवारी विजेतेपद पटकावल्यानंतर संघ मुंबईत दाखल झाल्यानंतर ‘बिग बी’ यांनी वेळ काढून संघाची भेट घेतली. मुंबईच्या संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले. अमिताभ यांनी मुंबईच्या संघातील पंड्या बंधूंसोबतचे फोटो आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहेत. यात त्यांनी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची भेट घेऊन विजयाचा आनंद साजरा केल्याचं म्हटलं आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची भेट झालेला दिवस अद्भुत असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here