Gachhi Marathi Movie Review

परिचित चौकटीतून बाहेर पडून वाटचाल करणारेही काही चित्रपट असतात आणि ‘गच्ची’ हा चित्रपट या मांदियाळीत चपखल बसतो. कडकडीत उन्हात इमारतीवरच्या गच्चीवर घडणारा हा चित्रपट, अलगद थंड वाऱ्याची झुळूक घेऊन येतो. मात्र या गच्चीवर फार काही घटना घडतात असेही नाही. त्यामुळे मग यात नक्की काय असेल, याची उत्कंठा वाढवण्याचे काम मात्र हा चित्रपट त्याच्या शीर्षकापासूनच करतो.

दोन प्रमुख व्यक्तिरेखांभोवती ही गोष्ट फिरते.गायिका असलेली कीर्ती,ही इमारतीच्या गच्चीवर तिच्या जीवनाचा शेवट करण्याच्या हेतूने आलेली आहे. पण त्याचवेळी स्वतःच्या विवंचनेत असलेल्या श्रीरामला रस्त्यावरून हे दृश्य योगायोगाने दिसते. परिणामी, तो त्या गच्चीवर येऊन पोहोचतो. कीर्ती कोणत्या कारणामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली आहे आणि श्रीरामची नक्की व्यथा काय आहे, हा या चित्रपटाचा विषय असला तरी ही गोष्ट केवळ तेवढ्यापुरतीच मर्यादित राहात नाही. कीर्ती व श्रीराम यांच्यात घडणाऱ्या संवादांतून ती अधिक उलगडत जाते.

या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या गोष्टीला दिलेली हटके ट्रीटमेंट! वास्तविक, ही गोष्ट अतिशय छोटी आहे; तिला काही कंगोरेही नाहीत. तरीसुद्धा ती बऱ्यापैकी खिळवून ठेवते.याचे मुख्य कारण म्हणजे लेखक योगेश जोशी व दिग्दर्शक नचिकेत सामंत यांनी तिची केलेली वेगळ्या प्रकारची मांडणी!  नाही म्हणायला, गच्चीवरच्या नायक-नायिकेसह या गोष्टीत इतरही काही मोजक्या व्यक्तिरेखा डोकावतात. मात्र त्यांना पूरक ठेवून निव्वळ गच्चीवरच्या व्यक्तिरेखांभोवती गोष्ट फिरवत ठेवण्याचे कौशल्य यात दिसते.

चित्रपटात नोटाबंदीच्या घटनेचा उपयोग करत या गोष्टीत रंजकता आणण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. पण यातल्या उंदीर प्रकरणाला नाहक जास्त फूटेज दिले आहे. तसेच, कीर्तीच्या गायिका असण्याचा धागाही गोष्टीत केवळ तोंडीलावणे म्हणून येतो. तिने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामागचे कारणही, आधुनिक जमान्यातल्या पर्यायांच्या उपलब्धतेनुसार जुन्यापुराण्या थाटाचे वाटते. त्या तुलनेत, श्रीरामच्या पार्श्वभूमीचे स्पष्ट प्रतिबिंब यात पडलेले दिसते. चित्रपटाचा लूक फ्रेश आहे आणि तांत्रिक बाबींमध्ये, राजू दास यांचा कॅमेरा या गच्चीवरून चांगला फिरला आहे.

अभय महाजन (श्रीराम) व प्रिया बापट (कीर्ती) या दोघांवर या चित्रपटाचा फोकस आहे. प्रियाच्या भूमिकेला फार काही कंगोरे नाहीत आणि ती सरळमार्गी जाणारी व्यक्तिरेखा असल्याने, ही भूमिका तिने सहजतेने निभावून नेली आहे. अभयने मात्र श्रीराम उभा करताना प्रगल्भतेचा आविष्कार सादर केला आहे. थोडाफार अर्कचित्रात्मक बाज या भूमिकेला आहे आणि अभयने तो चांगला आत्मसात केला आहे. आईच्या भूमिकेत असलेल्या आशा शेलार यांनी मोजक्या प्रसंगांतही छाप उमटवली आहे. अनंत जोग यांच्या वाट्याला यात खलनायकी छापाची भूमिका आली असली, तरी तिला कथेनुरूप नर्मविनोदाची झालर आहे आणि त्यांनी ती व्यवस्थित पेश केली आहे. एकूणच, या गोष्टीत तशी विविधता नसली, तरी गोष्टीच्या वेगळ्या मांडणीमुळे मात्र ही ‘गच्ची’ आपली वाटायला लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here