‘जय मल्हार’चा आवाज हिंदीतही घुमणार?

अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या दंतकथांवर आधारित ‘जय मल्हार’ या मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दिली होती. झी मराठीवर दररोज संध्याकाळी सातच्या ठोक्याला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यावेळी काही प्रेक्षकांनी मालिका बंद होण्यावर नाराजीही व्यक्त केली होती. पण, आता मिळालेल्या माहितीनुसार लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली ही मालिका हिंदी भाषेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related image

येत्या काही दिवसांत झी वाहिनीच्या हिंदी चॅनलवर ही मालिका प्रदर्शित केली जाणार आहे. त्यामुळे मराठी मालिकेचं हिंदीत डबिंग करुन हिंदी भाषिकांपर्यंतही खंडेरायांची महती पोहोचवली जाणार आहे. मराठीतून हिंदीत डब होणारी ‘जय मल्हार’ ही पहिलीच पौराणिक मालिका आहे. याविषयीच लोकसत्ता ऑनलाइनला दिलेल्या माहितीत महेश कोठारे म्हणाले, ‘मला वाहिनीकडून अशा प्रकारचा कोणताही फोन आलेला नाही किंवा अशी कोणतीच माहितीसुद्धा मिळाली नाहीये. सध्याच्या घडीला मालिकेसंदर्भात वाहिनीच योग्य तो निर्णय घेऊ शकते. त्यामुळे जर का ‘जय मल्हार’ हिंदीत डब करण्यात आली तर, ती खरंच खूप अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. यामुळे मालिका जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल. तसं पाहायलं गेलं तर याआधील कन्नडमध्येही डब झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यासोबतच येत्या काळात इतरही काही भाषांमध्ये मालिका डब करण्याबद्दल विचारविनिमय सुरु आहे.’

दरम्यान, हिंदी मालिकांचा प्रेक्षकवर्ग आणि त्याची व्याप्ती पाहता ‘जय मल्हार’ खऱ्या अर्थाने देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे असं म्हणायला हरकत नाही. पौराणिक कथेतील पात्रांची कलात्मक मांडणी करत त्यांना प्रेक्षकांपर्यत पोहोचवण्याची जबाबदारी महेश कोठारे यांच्या निर्मिती संस्थेने पेलली होती. त्यासोबतच या मालिकेमध्ये स्पेशल इफेक्ट्सचाही सुरेख वापर करण्यात आला होता. मराठी मालिकांना एका वेगळ्या स्तरावर नेणाऱ्या या मालिकेचं हिंदी व्हर्जन नेमकं कसं असणार आणि टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका तग धरु शकणार का याबद्दलची उत्सुकता लागून राहिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here