स्टार प्रवाहवर येतेय ‘कुलस्वामिनी’ ही नवी मालिका

सध्या भारतात ‘बाहुबली फिवर’ पाहायला मिळत आहे. ‘बाहुबली २’ चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. मात्र, प्रभासनं ‘बाहुबली’मध्ये शिवलिंग खांद्यावर उचलेला फोटो आजही प्रचंड लोकप्रिय आहे. आता मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येही हा बाहुबली फिवर पाहायला मिळत आहे. ‘स्टार प्रवाह’वर २२ मे पासून सुरु होणाऱ्या ‘कुलस्वामिनी’ या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या प्रोमोमध्ये अभिनेता संग्राम साळवीनं बाहुबलीप्रमाणेच देव्हारा खांद्यावर उचलून घेतल्याचं दिसते आहे.

प्रोमोमध्ये संग्रामनं ‘या घरात देवीला स्थान नाही’ असं म्हणून देव्हारा खांद्यावर उचलून घेतला आहे. या दमदार प्रोमोमुळे मालिकेचे कथानकाविषयी आणि त्यातील संग्रामच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये नक्कीच उत्सुकता वाढली असेल. याआधी, संग्रामची प्रमुख भूमिका असलेली ‘देवयानी’ ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेतील त्याचा ‘तुमच्यासाठी काय पण’ हा डायलॉग विशेष गाजला होता. एक वेगळ्या धाटणीचं कथानक असलेली ‘कुलस्वामिनी’ ही मालिका स्टार प्रवाहवर २२ मे पासून सुरू होत आहे. सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता ही मालिका दाखवली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here