यंटम-MARATHI MOVIE

टाइमपास, सैराट यांसारखे किशोरवयीन जोडप्यांच्या प्रेमकथेवर आधारित अनेक चित्रपट आपण आजवर पाहिले आहेत. यंटम हा चित्रपट देखील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या जोडप्याच्या प्रेमकथेवर आधारित आहे. पण हा चित्रपट आजवर आलेल्या किशोरवयीन जोडप्यांच्या प्रेमकथेपेक्षा वेगळा आहे. या चित्रपटात या दोघांसोबतच त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी, आपल्या कुटुंबासाठी त्यांनी घेतलेले काही कठोर निर्णय या गोष्टींवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
यंटम या चित्रपटात आपल्याला रंगा (वैभव कदम) आणि मीरा (अपूर्वा शेलगावकर) या दोघांची प्रेमकथा पाहायला मिळते. रंगाची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी तो लग्नामध्ये बँजो वाजवून त्याची हौस मौज करत असतो तर दुसरीकडे त्याचे वडील लग्नात शहनाई वाजवत असतात. आजकाल शहनाई, ढोल या पांरपारिक वाद्यांची जागा ही शहनाईने घेतली आहे आणि त्यामुळे त्यांना शहनाई वाजवण्याच्या खूपच कमी सुपाऱ्या मिळत असतात. आपल्याला मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशात आपले घर ते कसेबसे भागवत असतात. पण रंगा आपल्या मित्रांच्या आयुष्यात इतका रमलेला असतो की, घराच्या आर्थिक परिस्थितीची त्याला जाण नसते. कॉलेजमध्ये रमेश (अक्षय थोरात) आणि जेड्या (ऋषिकेष झगडे) या मित्रांसोबत मजा मस्ती करत असताना मीराच्या दप्तराला त्याच्याकडून आग लागते. मीराला पाहाताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडतो. मीरा तिच्या सावत्र आई आणि वडिलांसोबत राहात असते. तिची आई एका माणसासोबत पळून गेलेली असते. त्यावरून तिची सावत्र आई तिला नेहमीच घालून पाडून बोलत असते. पण मीराचे वडील नेहमीच तिच्या पाठिशी उभे राहात असतात. सावत्र आईच्या या वागण्यामुळे मीरा दुखावलेली असते. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते नेहमीच आपल्याला सोडून जातात असेच तिला वाटत असते. रंगा आपल्यावर वेड्यासारखा प्रेम करतो याची जाणीव झाल्याने मीरादेखील त्याच्याकडे ओढली जाते. त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. सगळे काही सुरळीत सुरू असताना अचानक रंगाच्या घराची भिंत पडते आणि त्यात त्याचे वडील त्यात जख्मी होतात. या घटनेमुळे रंगा आणि मीराच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते.

  • भाषा – मराठी
  • कलाकार – वैभव कदम, अपूर्वा शेलगावकर, अक्षय थोरात, ऋषिकेष झगडे, ऐश्वर्या पाटील आणि सय्याजी शिंदे
  • निर्माता – अमोल काळेदिग्दर्शक – समीर आशा पाटील
  • Duration – दोन तासGenre – ड्रामा

 

यंटम या चित्रपटाच्या मध्यांतरापर्यंत हा चित्रपट इतर किशीरवयीन जोडप्यांवर आधारित असलेल्या चित्रपटासारखाच वाटतो. तसेच चित्रपटात अनेक प्रसंग उगाचच टाकले आहेत असे वाटतात. पण शेवटच्या टप्प्यात दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी या चित्रपटाला एक वेगळेच वळण दिले आहे. चित्रपटातील अनेक गोष्टी दिग्दर्शकाने उलघडून सांगितलेल्या नाहीत. पण एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला चित्रपट पाहाताना त्या गोष्टींचा तर्क लगेचच लागतो. यातच दिग्दर्शकाचे यश आहे असेच म्हणावे लागेल. या चित्रपटाची सिनेमेटोग्राफी ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. तसेच बॅकराऊंड संगीत देखील खूप चांगले जमून आले आहे. मधुकर धुमाळ आणि ओमकार धुमाळ यांची शहनाई तर लाजवाब. चिनार-महेश या संगीतकार जोडीने आजवर अनेक हिट गाणी दिली आहेत. पण या चित्रपटातील ठाव लागंना हे गाणे वगळता कोणतेच गाणे ओठावर रुळत नाही. वैभव कदम, अपूर्वा शेलगावकर, अक्षय थोरात, ऋषिकेष झगडे, ऐश्वर्या पाटील या कलाकारांनी चांगले काम केले आहे. सय्याजी शिंदे यांनी त्यांची भूमिका खूपच चांगल्या प्रकारे वठवली आहे. त्यामुळे चित्रपट एकदा पाहायला काहीच हरकत नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here